राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेल असं दिसत नाही. आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी यावेळी राजीनामा देण्याची तयारीही दाखवली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संपूर्ण देशातलं ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीत आमचं डेटा एकत्र करण्याचं काम आम्ही करुच. मात्र आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत.
आणखी वाचा- OBC Reservation : महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार
सर्व पक्षांचं एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असंही त्यांनी अधोरेखित केलं आणि आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असंही ते म्हणाले आहे. त्याचबरोबर हा मुद्दा वाढवणं केवळ राजकीय हेतूने चाललं आहे. जनतेला सगळं कळत आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.
महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही. भाजपला हरवायचं यावर आघाडीचं एकमत आहे. ज्या ज्या महानगरपालिकेबाबत काय निर्णय घ्यायचा ते सर्वानुमते घेऊ. अ ब आणि क महापालिकेत किती वॉर्ड असावेत वगैरे ही चर्चा सुरू आहे. काहीच अंतिम निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.