मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी ( १४ नोव्हेंबर ) रात्री उशिरा बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर ही बैठक झाली. या बैठकीत दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावार चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणावरून काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली का? असे विचारले असता वडेट्टीवर म्हणाले, “जे काही चाललं आहे, ते योग्य नाही. राजकीय पक्षाच्या नेत्याला कट रचून अडकवणे, गुन्हे दाखल करुन त्याची प्रतिमा मलिन करणे ही भारताची प्रगती आहे की, अधोगती. विरोधकांना संपवून टाकायचे ही भूमिका संविधानाला न माननारेच स्विकारू शकतात.”
हेही वाचा : ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली. यावर विचारले असता, “किती लोकांनी बाशिंग बांधून ठेवलं आहे आणि त्यातील कितीजण नवरदेव होतात कळेलं. ज्यांना नवरदेव करणार नाहीत, ते दुसरी नवरी शोधण्यासाठी कुठे जातात पाहू,” असा टोला विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे.