Vijay Wadettivar : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धीवर ताशेरे ओढले. राज्यात आज कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले असून या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विशिष्ट समुहाची संस्था असल्याने आरोपीला वाचलं जातं आहे. या प्रकणात कारवाई करण्यास कमालीची दिरंगाई करण्यात आली. अशा नराधमाला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो? बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. अशा परिस्थितीती राज्याचं गृहखातं आणि गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे. कायद्याचा धाक नसल्याने गुंड प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात ताठ मानेने वावरत आहेत. अशा लोकांना सरकारमधील काही मंत्री मदत करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. पुढे बोलताना सरकारी तिजोरीतून महिलांना पैसे देऊन स्वत:ची पाठ थोपटणारे महिला अत्याचारावर का बोलत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
© IE Online Media Services (P) Ltd