Vijay Wadettiwar on Mahayuti Government : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या काही मैत्रिणींची मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही तर सामान्य मुलींची काय स्थिती असेल अशी चर्चा जळगावात ऐकायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी घडलेल्या प्रकारानंतर संताप व्यक्त केला आहे. खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांनंतर मुली पोलीस ठाण्यात जायला घाबरतात. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात महिलांविरोधातील गुन्हे वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणामुळे महायुती सरकार विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतानाच ही घटना घडली आहे. त्यामुळे विरोधक सरकारविरोधात आणखी आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घटनेनंतर सरकारवर जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सरकारविरोधातील संताप व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या मुली महाराष्ट्रात सुखरूप नाहीत, सामान्यांच्या मुलींची काय स्थिती असेल : विजय वडेट्टीवार

वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “पोलीस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची ही बातमी महाराष्ट्रातील वास्तव आहे! पोलीस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाहीत, त्या राज्यात शेतात काम करणाऱ्या, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई-वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ (संघर्ष) करत असतील आणि त्यांना किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.

राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही : वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले, “आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही, कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळते. महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे.आता तरी मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का?”