अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभेच्या विरोध पक्षनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यानंतर काही दिवसांनी स्वत: अजित पवारच काही आमदारांना घेत सत्तेत सामील झाले. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर आता महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अभिनंदन प्रस्ताव आणण्यात आला. अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. दरम्यान, त्यांनी बारामती शेजारील मतदारसंघात निवडणुकीला उभं राहायचं आपलं धाडस नाही, अशी कबुलीही दिली. तसेच त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचं कौतुकही केलं.
हेही वाचा- “सरकार आणखी किती खोटं बोलणार?” आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच सादर, पाहा VIDEO
विजय वडेट्टीवार यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “तुम्ही जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा विदर्भात शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं. पण तुम्ही चंद्रपूर, चिमूर आणि ब्रम्हपुरी अशा ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. त्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनीही तुम्हाला मार्गदर्शन केलं. पण तुमचं सगळं काम बघूनच १९९८ साली तुम्हाला विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं. त्यानंतर आज तुम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेता झाला आहात. तुमची विधीमंडळातील २५ वर्षांची राजकीय कारकीर्द झाली आहे. पुढेही तुमची कारकीर्द अशीच चालू राहणार आहे. कारण तुम्ही शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये तुम्ही तुमची राजकीय भूमिका सोडली नाही.”
“आमच्या भागात मतदारसंघ बदलणं फार अवघड असतं, म्हणजे मी बारामतीत पहिल्या क्रमांकाने निवडून येईल. पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहायचं धाडस आपण दाखवू शकत नाही. पण तुम्ही संगमनेरमध्येही उभे राहून प्रचंड मताने निवडून येऊ शकता. आम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाताना दहावेळा विचार करतो. पण तुम्ही मात्र चिमूरला निवडून आलात. ब्रम्हपुरीला दोनवेळा चांगल्याप्रकारे निवडून आलात. अर्थात तुमचं काम चांगलं आहे. तुमचा जनसंपर्क चांगला आहे, म्हणूनच तुम्ही हे सगळं करू शकलात,” असंही अजित पवार म्हणाले.