तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरुन पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर जास्त गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर डॉ. घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत आरोग्य समितीचा अहवालही आला आहे. ज्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसेंना वेळेत उपचार दिले नाहीत असं म्हणण्यात आलं आहे. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या सगळ्या गोष्टी घडतनाच तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका होत आहे.
विजय वडेट्टीवार यांची पोस्ट काय?
मंगेशकर रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सातत्याने मागणी करत आलो आहोत या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असूनही रुग्णांकडून पैसे घेऊनच उपचार केले जातात. ही कोणती सेवा? हा कोणता धर्म? डॉक्टरांनी राजीनामे देत जबाबदारी झटकली, आणि आता पळवाट शोधण्याचे काम सुरु आहे! सरकार अजून तरी नक्की कशाची वाट बघत आहे? पुन्हा काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ सरळ क्लिनचीट द्यायची आहे? या प्रकरणातील डॉक्टर असो किंवा रुग्णालय प्रशासन जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे! असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा
दीनानाथ रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतही डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या रुग्णावरील उपचारात बाधा येऊ नये म्हणून आगामी दोन ते तीन दिवस ते सेवा देतील. त्यानंतर ते त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होतील, अशी माहितीही डॉ. केळकर यांनी दिली आहे.