गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केलं आहे. “रोज सकाळी जरांगे-पाटील आणि भुजबळांमध्ये उत्तर-प्रत्युत्तर सुरू आहे. महाराष्ट्र काय हा तमाशा पाहण्यासाठी आहे का? जरांगे-पाटलांना मागण्याचा अधिकार आहे. पण, तुम्ही ( भुजबळ ) महाज्योतीबद्दल विधानसभेत मागणी करत आहात. मंत्रीमंडळात मागा ना,” असं आव्हान वडेट्टीवारांनी भुजबळांना दिलं आहे. ते विधानसभेत बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, “भुजबळांना थोडे समजायला हवे. सरकारमध्ये बसून न्यायनिवाडा करायचा आणि मंत्रीमंडळात अधिकार मिळवून घ्यायचे. पण, तुम्ही ( भुजबळ ) महाराष्ट्रासमोर छाती फाडून घेत आहात. छाती फाडल्यावर काय निघते, हे काही दिवसांनी दिसेल.”
हेही वाचा : विधानसभेत आव्हाडांकडून जरांगेंची पाठराखण तर भुजबळांवर हल्लाबोल; म्हणाले, “त्यांच्या तोंडून…”
“मंत्रीमंडळात मागण्याचा अधिकार तुम्हाला”
“करोनाच्या काळात सरकारमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. तेव्हा अनेक निर्णय घेतले. मी राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी धडपडत होतो. तेव्हा भुजबळ शांत पाहत होते. ‘सारथीला पैसे दिले, महाज्योतीला दिले नाहीत,’ असा आरोप भुजबळांनी विधानसभेत केला. मात्र, मंत्रीमंडळात मागण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे. तुम्ही तो मिळवा. नाहीतर खुर्चीला लाथ मारा. सरकारमध्ये राहायाचं, बोलायचं, मारायचं आणि मरायचं, ही कुठली भूमिका आहे,” असा संतप्त सवाल वडेट्टीवरांनी भुजबळांना विचारला आहे.
हेही वाचा : “२४ डिसेंबरला माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु, माझं घरही जाळलं तर..”, भुजबळांचा जरांगेंवर आरोप
“मराठा समाजाला आरक्षण द्या, पण…”
“सारथी एवढे पैसे महाज्योतीला मागण्याचा अधिकार विरोधक असल्यानं मला आहे. देण्याचा अधिकार सरकारचा आहे. सरकारनं दिलं पाहिजे. मात्र, भुजबळ मागत बसले आहे. कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा… मराठा समाजाला आरक्षण द्या. पण, ओबीसींच्या हक्काचं आरक्षण काढू नये,” असं वडेट्टीवारांनी म्हटलं.
“मराठा समाजात खूप मोठ्या प्रमाणात गरीबी आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा आहे,” असंही वडेट्टीवार म्हणाले.