Beed Crime Videos: गेल्या तीन-चार महिन्यांपासून बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे संपूर्ण जिल्हा चर्चेत आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर या प्रकरणातील एक आरोपी वगळता इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर धनंजय मुंडे यांना त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडही या प्रकरणात असल्याचे आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांचा कार्यकर्त्या सतीश उर्फ खोक्या भोसले यालाही एका मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आले आहे.

बीडमधील गुन्हेगारी घटनांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, बीड हे राजकारणी सापांचं बीळ झालं असल्याची टीका केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांना बीडमधील गुन्हेगारीवर प्रश्न विचारण्यत आला होता. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

राजकारणी सापांचं बीळ

विजय वडेट्टीवार यांना बीडमधील गुन्हेगारी घटनांबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “बीड आता राजकारणी सापांचं बीळ झालं आहे. तिथं जो घुसतो तो साप बनून येतो, नाग बनून येतो, अजगर बनून येतो. कोणी विंचूही बनून येईल आणि एकमेकांना चावत राहतील. ही बीडची सध्याची राजकीय परिस्थिती आहे.”

नितेश राणेंच्या बोलण्यातून

यावेळी वडेट्टीवारांना सध्या राज्यात मटन सर्टिफिकेशनच्या वादाबाबत विचारले असता, ते म्हणाले, “काय ते? सोडा ना, नितेश राणे मंत्री झाले आहेत ठीक आहे. त्यामुळे यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. आम्ही त्याकडे लक्षही देत नाही. नितेश राणेंच्या या सगळ्या बोलण्यातून राम भरोसे हिंदू हॉटेल जोरदार चालवावं हे एकच दिसत आहे.”

सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक

भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीडमधील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली. एका इसमाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून तो फरार होता. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्यचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं आणि थेट प्रयागराज गाठलं. तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या.