Vijay Wadettiwar On Walmik Karad Encounter Santosh Deshmukh Murder Cace : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जावी या मागणीसाठी राज्यात आंदोलने केली जात आहेत. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचे बीड पोलीस स्थानकात लाड केले जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात असल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वडेट्टीवार म्हणाले की, “पोलिस स्टेशनध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलीसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे”.
तर वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो
वडेट्टीवार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने, या गुन्ह्यातील सुत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे इन्काऊंटर केले जाऊ शकते असा दावा देखील यावेळी केला आहे. “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती, जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली. यावरून काहीही होऊ शकतं, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे”, असा खळबळजनक दावा देखील वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
हेही वाचा>> Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! राज्य सरकारने स्थापन केली SIT
विजय वडेट्टीवार यांची पोस्ट
विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल!”
“वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे!”, असेही वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.