Vijay Wadettiwar on Maharashtra Cabinet Minister : पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्र्यामुळे हे सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पैलवान मंत्र्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, असे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असतील तर ते खूपच लज्जास्पद आहे. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला मंत्र्याकडून त्रास दिला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री, जो रोज व्यायाम करतो, त्याने विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवले आहेत. याप्रकरणी त्याने १० दिवस तुरुंगाची हवा खाल्ली आहे. १० हजार रुपयांचा दंड भरून, न्यायालयाची माफी मागून तो तुरुंगातून सुटला आहे. अलीकडेच तो मंत्री झाला आणि पुन्हा त्या महिलेच्या मागे लागला आहे. एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवणारा माणूस मंत्रिमंडळात असणं या राज्यासाठी लज्जास्पद आहे.
दरम्यान, हे मंत्री म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असल्याची चर्चा चालू होती. अशातच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर जयकुमार गोरे यांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप केले. मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा थेट उल्लेख करून त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर आता जयकुमार गोरे यांनी या सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केलं असून माझ्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी असं गोरे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, स्वारगेटमध्ये जो प्रकार (बलात्कार) घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय. शिवकाळातील सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेचा या मंत्र्याने कसा छळ आणि विनयभंग केला आहे, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला पुढील काही दिवसांत विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. ही सर्व रत्नं त्यांनी एकदा तपासली पाहिजेत.”
वडेट्टीवारांचे आणखी एका मंत्र्यावर आरोप
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी आणखी एका मंत्र्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळातील उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली आहे. आपण अशी कल्पनाही करू शकत नाही. आपल्या कल्पनेपलिकडे यांचे काळे धंदे चालू आहेत. काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली आहे.