Vijay Wadettiwar On Union Budget 2025 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. “बिहार विधानसभा निवडणुकीला समर्पित केलेले आजचे बजेट आहे. एकीकडे बिहारला भरभरून दिलेले असून, दुसरीकडे महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात आली आहे,” असे विजय वडेट्टीवार एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“हे बजेट भारताचे नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेले बजेट वाटते. भारताचे बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना म्हणता येईल. देशातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर, बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीच्या संदर्भात कोणतीही ठोस तरतूद या बजेटमध्ये दिसून येत नाही. शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, पीक विम्यामध्ये बदल करावा अशा प्रकारची कुठलीही सुविधा यामध्ये दिसली नाही. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या बजेटमध्ये झाले,” असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. “मुंबई-अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोसाठी पैसे पण ग्रामीण आणि उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही मोठी तरतूद नाही. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम या बजेटमध्ये केलं आहे”, असे वडेट्टीवार म्हणाले.

“या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांची जीएसटी, टॅक्सवाढ आणि महागाईच्या माध्यमातून लूट करून त्याला केवळ इन्कम टॅक्समध्ये सूट दिली एवढाच या बजेटचा अर्थ लागतो. पण त्यापलीकडे दुसरी कोणतीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये दिसली नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण कृषी मालाला हमी भाव देणे आणि तो किती द्यावा याबद्दल स्पष्टता बजेटमध्ये दिसायला हवी होती. यासंबंधी कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही,” असेही वडेट्टीवार म्हणाले.

“फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणांचा पाऊस पडला. मुंबई, पुणे या दोन शहरातील मेट्रोसाठी दिलेले पैसे आणि अहमदाबाद रोडला दिलेले पैसे यापलीकडे महाराष्ट्राला काय दिलं? तेवढंच दिलं नवीन काही महाराष्ट्राला दिलेलं नाही. म्हणून हे बजेट भारतातील लोकांना मागे घेऊन जाणारे हे बजेट आहे,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Story img Loader