जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान, यावरून आता राजकीय वातावरणदेखील तापू लागलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्यांवर संकट आलं असताना, सरकार मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्दावरून राज्यातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्याचा एक व्हिडीओ एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत शिंदे सरकारवर टीका केली आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत, पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये ‘मीच होणार मुख्यमंत्री’ ही स्पर्धा सुरू आहे. तिघे ही एकमेकांना पछाडण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत. त्यांना हा रडणारा बळीराजा दिसत नाही, नराधमांनी अत्याचार केलेल्या पीडित लेकी दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान दिसत नाही, त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची ‘खुर्ची‘ दिसते”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“…पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”
पुढे बोलताना, “मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून इव्हेंट करणे सुरू आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत, पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचीही शिंदे सरकावर टीका
विजय वडेट्टीवार यांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटानेही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. “गेल्या आठवड्याच्या अखेरीस मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पाऊस इतका भयंकर होता की, अवघ्या काही तासांत सर्व नदीनाल्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा वेढा पडला. शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले व शेतातील सारी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाली आहेत. या भयंकर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलायला हवीत. ‘लाडकी बहीण’ योजनेची ‘इव्हेंट’बाजी करण्यात रमलेल्या खोकेशाही सरकारने अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे दुःखही समजून घेतले पाहिजे”, अशी टीका ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर केली आहे.