आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर शिंदे फडणवीस सरकारने सत्तेतून पायउतार व्हावं, मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, ते आम्ही बघू. आम्ही यातून मार्ग काढू. मात्र, सरकारमध्ये ती धमक नाही. सरकारकडून अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच राज्यात जो ओबीसी-मराठा संघर्ष सुरू आहे, त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Breaking : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ!

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात जो संघर्ष वाढला आहे, त्याला महायुतीचे सरकार जबाबदार आहे. दोन्हीही समाजाच्या नेत्यांनी जेव्हा उपोषण केलं, तेव्हा ते स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती की, त्यांनी तेव्हा विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. मात्र, त्यांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही. दोन्ही समाजाच्या नेत्यांना काय आश्वासन दिल? हे विरोधीपक्षाला सांगितलं नाही. सरकारकडे २०६ सदस्यांचं पाशवी बहुमत आहे अशावेळी सरकारने दोन्ही समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, पण अशी भूमिका न घेता दोन्ही समाजाला झुंजवत ठेवण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवर यांनी केली.

“आज दोन्ही समाजामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आज सरकारच्या नाका-तोंडात पाणी आलं आहे. ज्यावेळेस विरोधकांना विश्वासात घेण्याची गरज होती, तेव्हा त्यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. आता निर्णय घेण्यापासून कोणीही थांबवलं नसताना त्यांना आमची गरज का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचा – Video: मालेगावच्या ‘कुत्तागोळी’वर विधानसभेत चर्चा; अनिल देशमुख म्हणाले, “कुत्तीगोळीही असते, तुम्हाला माहिती आहे का?”

“सरकारने मराठा समाजाच्या भावनांशी खेळ केला आहे. आज ते ओबीसी बांधवांच्या भावनांशी खेळत आहेत. दोन्ही समाजांमध्ये जो संघर्ष उभा राहिला आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार महायुतीचे सरकार आहे. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारला मार्ग सापडत नसल्याने आम्हाला बरोबर घेऊन विरोधकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून सुरू आहे”, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

“सरकारला जर आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, आरक्षण कसं द्यायचं ते आम्ही बघू. आम्ही यातून मार्ग काढू. मात्र, सरकारमध्ये ती धमक नाही. सरकारकडून अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे”, असेही ते म्हणाले.