बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. अन्य एका प्रकरणाच्या तपासासाठी नेत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधीत पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून काही प्रश्नही उपस्थित केले.

विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणावरून शिंदे गट-भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हा जर न्याय असेल, तर महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे एन्काऊंटर का नाही केले? त्यावेळी न्याय द्यायचा नव्हता का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

“पोलिसांच्या प्रेसनोटमधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक”

“ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेलं असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवलं असेल तर मग त्यानं बेड्या लावलेल्या हातानं बंदूक कशी खेचली? त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीनं बंदुकीचं लॉक कसं उघडलं? ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? असे एक नाही अनेक सवाल उपस्थित होत आहे ”, असेही ते म्हणाले.

“पोलिसांनी काढलेली प्रेसनोट ही हास्यास्पद”

“पोलिसांनी काढलेली प्रेसनोट ही हास्यास्पद आहे. कारण पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती, की त्याला मारण्यासाठी चालवली होती? कैद्याला ने-आण करण्याचं काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं नसतं. त्यांचं काम तपास करणं असतं. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता?” असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

“…ब्रिजभूषण सिंहचे एन्काऊंटर का नाही केले?”

“हाच जर न्याय असेल, तर महिला कुस्तीगीरवर अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंहचे एन्काऊंटर का नाही केले? त्यावेळी न्याय द्यायचा नव्हता का? स्वतःच्या लोकांना वाचवण्यासाठी वाटेल तसा कायदा मोडायचा असा भाजपचा कारभार आहे”, असी टीकाही त्यांनी केली.