राष्ट्रवादी काँग्रेसमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फुटीनंतर पुण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. ही भेट गुप्तपणे झाल्याची चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) नेत्यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचं स्पष्ट केलं. परंतु, या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसतंय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तसेच काँग्रेसमधील नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रम असल्याचं म्हटलं आहे. अशातच शरद पवार महाविकास आघाडीत नसतील तर काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट मिळून आगामी निवडणुका एकत्र लढतील असं बोललं जात आहे. यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, अशा भेटीगाठी (शरद पवार आणि अजित पवारांची भेट) होत असतात. राजकारणापलिकडे आपली नाती असतात, त्यामुळे ते भेटले असतील. त्या भेटीचा वेगळा अर्थ लावून ते आमच्याबरोबर नाहीत असं म्हणणं सध्या चुकीचं आहे. ठीक आहे, सध्या संभ्रमाचं वातावरण आहे, परंतु, हा संभ्रम ते (शरद पवार) दूर करतील. राहिला विषय काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकत्र लढण्याचा, तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा निर्धार पूर्वीपासून आहे.

हे ही वाचा >> “नवाब मलिक अजित पवारांच्या गटात…” राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही एकत्रच असू. मुळात त्यांनी त्यांची भूमिका आधीही स्पष्ट केली आहे. त्यामुळे कोणीही संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही समविचारी आहोत. तसेच शिवसेनेचा ठाकरे गट आमच्याबरोबर आहे. ही महाविकास आघाडीची मोट आम्ही पूर्वीच बांधली आहे. माणसं जातात, नेते पक्ष सोडून जातात, परंतु, जनता जात नाही. जनता तिथेच असते. असा संभ्रमाचा विचार करणं आत्ता योग्य नाही. केवळ आम्ही आणि ठाकरे गटाने एकत्र लढण्याची कुठलीही चर्चा सध्या झालेली नाही.

Story img Loader