Vijay Wadettiwar : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघाताने पडला, असं विधान आज मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरून दीपक केसरकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमंक काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
“अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे. महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले, हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
पुढे बोलताना, “बदलापूर प्रकरण अपघात होता, समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले तो अपघात होता, नांदेडमधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली तो अपघात होता, ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता, महाराष्ट्रभर ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे, तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता, रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत, ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत”, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.
“तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी मीच किती मोठा जनतेचा रखवाला आहे, हे दाखवण्यासाठी जी धडपड तिघांची सुरू आहे, त्यामुळेच हे सगळे अपघात घडत आहेत”, असा टोलाही त्यांनी महायुती सरकारला लगावला.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावं, कदाचिक वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल. हा अपघात नेमका कसा घडला. याचा तपास सुरू आहे. यात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल. पण कारवाई केल्याने जखमी भरून येत नाही. जखमा भरून यायच्या असतील, तर अतिशय भव्य पुतळा याठिकाणी उभा करावा लागेल. महाराजांसाठी तीच खरी आदरांजली ठरेल”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd