Vijay Wadettiwar on Manikrao Kokate Cheating case : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी कोकाटे यांच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आली होती. त्यांनी तशी याचिका दाखल केली होती. दुसऱ्या बाजूला कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये अशी मागणी करत विरोधकांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी सोमवारी (१ मार्च) निकाल येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, न्यायालयाने हस्तक्षेप अर्ज फेटाळले आहेत आणि या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होईल असं सांगितलं आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंत्री म्हणून कामकाज करणार हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंबंधीची एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंत्री म्हणून कामकाज करणार हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार, असे चित्र आहे! आज मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, कोर्टात पुढील सुनावणी ५ मार्च रोजी आहे. असं असताना कृषीमंत्री या पदावर माणिकराव कोकाटे बसू शकत नाही”.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, कोकाटे यांना शिक्षा झाल्याने ते मंत्री म्हणून अधिवेशनात कसे सहभागी होऊ शकतात? त्यांची आमदारकी अजून रद्द का झाली नाही? हा संशोधनाचा विषय आहे. पण दोषी असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अधिवेशनाच्या कामकाजात मंत्री म्हणून कोकाटे यांना सहभागी करून घेऊ नये. एक मंत्री ज्याला भ्रष्टाचार आणि कागदपत्रांची फेरफार केल्याप्रकरणी कोर्टाने आरोपी म्हणून शिक्षा सुनावली आहे तो मंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे काय काम करणार?”

काय आहे प्रकरण?

बनावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. अपिलात सत्र न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीस अपिल प्रलंबित असेपर्यंत स्थगिती दिली. शिक्षेला स्थगिती देण्यासाठीच्या अर्जावर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने शनिवारपर्यंत (१ मार्च) निर्णय राखून ठेवण्यात आला होता. शनिवारी याप्रकरणी न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. कोकाटे यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या स्थगितीला सिन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे शरद शिंदे यांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे हरकत घेतली होती. त्यांचे वकील सतीश वाणी यांनी सत्र न्यायालयाने मंत्र्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये, अशी मागणी केली. तसेच या न्यायालयास स्थगिती देण्याचा अधिकार नाही. असे अधिकार केवळ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाला आहेत. माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्यापासून ते माजीमंत्री संजय केदार यांच्यापर्यंतच्या खटल्यांच्या निवाड्यांचे दाखले त्यांनी दिले. कृषिमंत्री कोकाटे यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल असून सदनिका लाटल्याच्या प्रकरणात ते दोषी ठरल्याचे ॲड. वाणी यांनी सांगितले.

Story img Loader