राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्र सोडलं आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली. ठरावीक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला आणि ९० टक्के आमदारांना निधीच मिळाला नाही, अशी तक्रार आव्हाडांनी केली. त्यांच्या बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडे होते. संबंधित नेत्यांना सरकारकडून मोठा निधी मिळाला असल्याची चर्चा आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड हा भांबावला आहे. पागलसारखा झालाय आहे. तो काय बोलतो, ते त्यालाच कळत नाही. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षातील जयंत पाटील आणि राजेश टोपे यांना मिळालेल्या निधीवर बोलावं, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यामुळे विरोधकांमध्ये निधीमुळे धुसमूस सुरू असल्याचं समोर आलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “विरोधी पक्षनेत्याला एकट्यालाच निधी मिळाला नाही. तो (जितेंद्र आव्हाड) काय बोलतो, हे त्यालाच कळेना. तो भांबावला आहे. तो पागलसारखा झालाय. आम्ही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना कमी अधिक प्रमाणात पैसे मिळाले आहेत. आम्हाला २६-२७ कोटी रुपये मिळाले.”

हेही वाचा- “…तर हे सगळं खोटं ठरेल”, मराठा आरक्षणाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

“जयंत पाटील आणि राजेश टोपेंनाही पैसे मिळाले होते, त्यावर आव्हाड का बोलले नाहीत? त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप करावेत. आमच्यावर कशासाठी आरोप करता? आम्ही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. बाकीच्यांनी जसा प्रस्ताव पाठवला, तसा आम्हीही प्रस्ताव पाठवला. त्यांना (सरकारला) वाटलं विरोधी पक्षाला निधी द्यावा, त्यामुळे त्यांनी निधी दिला. याआधीही असंच व्हायचं, काही नेत्यांना मिळायचा. पण आम्ही मात्र दिलदार होतो. आम्ही पाच कोटी घेतले तर विरोधकांना दोन कोटी द्यायचो. पण आता विरोधी पक्षाच्या आमदारांना निधीच देत नाहीत आणि समतोल विकासाच्या गोष्टी करतात, हा ढोंगीपणा आहे. त्यामुळे आव्हाडांनी त्यांचा राग एकनाथ शिंदेंवर काढावा,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. ते चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar on ncp mla jitendra awhad on fund distrubution rmm
Show comments