Pune Viral Video Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याच्याराच्या काही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यादरम्यान पुण्यात एका तरुणाने बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद रस्त्यातच लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर त्याला जाब विचारणाऱ्या व्यक्तीला युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याबरोबरच या तरुणावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच आरोपी तरूणाविरोधात पुण्यातील येरवाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी व त्याच्या मित्राचा शोध घेत आहेत.

या घटनेचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

महिला दिनाच्या सकाळीच समोर आलेल्या या घटनेबद्दल वड्डेट्टीवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. “पुण्यात गुन्हेगारांची दादागिरी सुरूच….! पुण्यातील शास्त्रीनगर भर चौकात एका मद्यधुंद तरुणाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवणं, रस्त्यावर अशोभनीय कृत्य करणं, त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करणं – हा गुन्हा फक्त निबंध लिहून घेऊन पुन्हा पोलिसांनी माफ करू नये. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे!” असे वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“महिलांच्या सुरक्षेबाबत गाजावाजा करणाऱ्या सरकारने यावर तत्काळ पाऊल उचललं पाहिजे. दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात येत आहे,” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.