Vijay Wadettiwar : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशासंदर्भात आता आघाडीच्या नेत्यांकडून त्यावर विचारमंथन करण्यात येत आहे. असं असताना आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु करत पक्षबांधणी करण्यास विरोधकांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवरच बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं सूचक केलं. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच संजय राऊत यांच्या या विधानानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही सूचक भाष्य केलं आहे. “त्यांच्या (ठाकरे गट) पक्षाची जशी इच्छा असेल तशी आमचीही इच्छा असेल, अशी सूचक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या संजय राऊत यांच्या विधानासंदर्भात विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “त्यांची (ठाकरे गट) काय इच्छा आहे? ती त्यांचा प्रश्न आणि आमची काय इच्छा आहे ते आम्ही त्यावेळी (महापालिका निवडणुकीवेळी) पाहूयात. आजतरी आम्ही महापालिका निवडणुका कशा लढवायच्या? यासंदर्भात विचार केला नाही. पण आम्हाला वाटतं की महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे. पण त्यांच्या (ठाकरे गट) पक्षाची तशी इच्छा असेल तर तशी आमचीही असेल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावी लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरु झाले आहेत, तुम्ही सगळे पाहात आहात. मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुकी स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही. मुंबई ओरबाडली जाते आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. मी हे म्हणत नाही की आम्ही स्वतंत्रपणे लढू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. आमची चर्चा सुरु आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
जयंत पाटील काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं सूचक विधान केलं. संजय राऊत यांच्या या विधानाबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता जयंत पाटील यांनी आपण त्यांचं विधान काय आहे ते ऐकतो आणि नंतर प्रतिक्रिया देईन, असं म्हणत अधिक बोलणं टाळलं.