देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर भाष्य केलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही ( २१ डिसेंबर ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे,” असं राऊतांनी म्हटलं.
“महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. आम्ही २३ जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे,” असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा : “जितेंद्र आव्हाड भांबावलाय, पागल झालाय”, एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका
“हायकमांड निर्णय घेतील”
विजय वडेट्टीवारांनी म्हटलं, “संजय राऊत २३ जागा लढवणार म्हणत असतील, तर त्यांच्या विधानाचं खंडण कशाला करू. हायकमांड निर्णय घेतील. हायकमांडने ठरवलं असेल, तर आमचा अधिकार नाही. त्यामुळे याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही.”