मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. दरम्यान, आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनीही यावरून महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे.

विजय वडेट्टीवर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यातील खंडजंगीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, ही फक्त सुरूवात असून यापुढे ते एकमेकांचे कपडे फाडतील, अशी खोचक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवर यांनी दिली.

हेही वाचा – ‘अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळा’, भाजपानं संघाला विनंती केल्याची चर्चा; राजकीय तर…

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

ही फक्त सुरुवात आहे. यापुढे ते लोक एकमेकांचे कपडे फाडतील. आज राज्यात फक्त निधीतीच लुटालूट सुरू आहे. हे लोक उद्या ठोसे मारण्यापर्यंत जातील. मुळात महाराष्ट्रात महायुतीमध्ये सध्या शितयुद्ध सुरू आहे. हे शितयुद्ध ठोसेयुद्धा परावर्तीत होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे, असं विजय विजय वडेट्टीवर म्हणाले.

अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका

यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावरून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार यांनाही लक्ष्य केलं. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ धुळफेक करणारा आहे. काही लोकांनी मोदी सरकारला जो पाठिंबा दिला, त्यांची मर्जी सांभाळणारा हा अर्थसंकल्प आहे. इंडिया आघाडी निडणुकीच्या काळात जी आश्वासने दिली होती, ती चोरून त्याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही. याचा अर्थ राज्यातील शिंदे सरकारची दिल्लीच्या दरबारी काहीही इज्जत नाही, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचं सरकार येत नाही. हे दिल्लीतल्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाला निधी देऊन उपयोग काय? या भावनेतून केंद्र सरकार काम करते आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं आहे. महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. या सरकारने आता महाराष्ट्राला ठेंगा दाखवला आहे, पण दोन महिन्यांनी राज्यातील जनता यांना ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुख यांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर टीका केली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं की ओबीसी कोट्यातून हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. मात्र, ते विधकांना बोलत का नाही, म्हणून विचारत आहेत. हे म्हणजे उलटा चोर वरून शिरजोर, असा प्रकार आहे. मुळात आरक्षणचा संपूर्ण गोंधळ राज्य सरकारने घातला आहे, तो त्यांनीच सोडवावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.