केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह रविवारी (६ ऑगस्ट) पुण्यात आले होते. यावेळी नव्यानेच राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शाह पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. पुण्यात आयोजित कार्यक्रमात अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. अमित शाह म्हणाले, “अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे यायला तुम्ही थोडा उशीर केलात.” यावेळी अमित शाह यांनी अजित पवार यांचं तर अजित पवारांनी अमित शाह यांचं खूप कौतुक केलं.
अमित शाह यांनी अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी अजित पवार आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तसेच महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपण भाजपाबरोबर आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं. विजय वडेट्टीवार म्हणाले, “अमित शाहांनी अजित पवारांना ७०,००० कोटींचं व्याज बरोबर मिळतंय ना? असं विचारलं असेल.”
विजय वडेट्टीवार म्हणाले, आता महाराष्ट्रात सगळेच जण मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकासच झाला नाही. काहींना वाटतंय की फक्त आता अजित पवारच असे आहेत जे राज्याचा विकास करू शकतील. परंतु, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक बदनाम करणाऱ्या लोकांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीला अजित पवार न्याय देऊ शकतील का?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणाले, काल खूप कौतुक झालं म्हणे, अमित शाह यांनी कौतुक केलं. कानातही कुजबूज केली म्हणे. कदाचित अमित शाह यांनी अजित पवार यांना विचारलंही असेल, बाबा रे ७०,००० कोटींचं व्याज बरोबर येतंय ना? ते पैसे सुरक्षित ठेवले आहेत का? कुठल्या तिजोरीत ठेवलेत? असं त्यांनी कानात विचारलं असेल. नाहीतर ते म्हणाले असतील, आता विसरून जा बाबा, आम्ही केलेला आरोप तुम्ही विसरून जा.
हे ही वाचा >> अंबादास दानवेंबरोबरच्या राड्यानंतर संदीपान भुमरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आवाज…
विजय वडेट्टीवर म्हणाले, अमित शाह अजित पवारांच्या कानात म्हणाले असतील, तुम्ही खाल्ले (पैसे) की नाही खाल्ले… पण आम्ही तुम्हाला बदनाम केलं. परंतु, पुढच्या वेळी मात्र तुम्हाला सर्वात इमानदार, प्रामाणिक म्हणू. जगातील सर्वात प्रमाणिक कोण असेल तर ते अजित पवार आहेत असं आम्ही सांगू. म्हणून पाठीवर थापसुद्धा दिली. असंच खात राहा पुढे जात राहा, असंही अमित शाह म्हणाले असतील.