प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आहेत. महायुतीच्या या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु, त्यांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. बच्चू कडू यांनी आज (९ ऑगस्ट) अमरावतीत जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या १० प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या मोर्चाद्वारे बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेने एकनाथ शिंदे सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, बच्चू कडू यांना कोण ऐकतं? त्यांना कळून चुकलंय… पुढच्या काही दिवसात बच्चू कडूंना कळेल की त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे ते लवकरच योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.
हे ही वाचा >> महात्मा फुले-सावित्रीबाईंचा विचार सांगणारे हरी नरके काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन
यावेळी विजय वडेट्टीवार हे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवरही बोलले. वडेट्टीवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चा सुरू आहे. ही चर्चा अशीच सुरू राहील. पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही चर्चा सुरू ठेवली जाईल. किमान पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी असंच चित्र कायम राहील. कारण सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक जण नाराज आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांमध्येही नाराजी आहे. या नाराजी नाट्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.