Vijay Wadettiwar on BJP & Eknath Shinde : दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे दाखल झाले आहेत. उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावटळ उठली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की भाजपा आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल. तसेच शिवसेनेत आात नवा ‘उदय’ होईल.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी काहीशी स्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रयत्न दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलं बरं. त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचं ठरेल. सध्याची महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांच्या मित्रपक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत का अशी भीती मला वाटत आहे”.
उदय दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी एक वक्तव्य करत आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन उदय पुढे आणला जाईल. तो उदय कुठला असेल ते मी सांगत नाही. मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल”. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विजय वडेट्टीवार यांना विचारलं की “तुम्हाला उदय सामंत यांचा उल्लेख करायचा आहे का?’ त्यावर, वडेट्टीवार म्हणाले, “उद्याचा शिवसेनेचा तिसरा उदय असेल. तुम्हाला नवा उदय दिसू शकतो आणि ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत. त्यांनी दोन्ही बाजूंशी सुंदर संबंध निर्माण करून ठेवले आहेत आणि हे प्रयत्न उद्यासाठीच आहेत.
सामंतांचं स्पष्टीकरण
उदय सामंत यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य मी नुकतंच ऐकलं. त्यांचे वक्तव्य हा एक राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रिपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही.”