काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवर यांनी आज दिल्ली येथे जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, बाळासाहेब थोरात यांनी दिलेला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बातचित केली. यावेळी वडेट्टीवार यांना विचारले की, बाळासाहेब थोरात यांनी दिलेला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला आहे का? यावर वडेट्टीवार म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही ही गोष्ट काँग्रेस हायकमांड ठरवेल.”
वडेट्टीवार म्हणाले की, “थोरातांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय हा काँग्रेस हायकमांड घेईल. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय देखील काँग्रेस हायकमांड घेईल. खर्गे यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मी त्यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी मी राज्यातली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली.”
“पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता”
संजय राऊत यांनी अलिकडेच असं वक्तव्य केलं आहे की, नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. याबाबत वडेट्टीवार यांना विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, नाना पटोले हे सक्षम नेते आहेत. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून उत्तम काम केलं. परंतु त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मोठा पेच निर्माण झालां. नवीन अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. परिणामी महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकलं असतं, अशा सर्वांच्या भावना होत्या.”
हे ही वाचा >> “राहुल कलाटेला कुणाची फूस? याबाबत माहिती घेऊ” असे सांगताना अजित पवारांनी पत्रकारांना दिली तंबी
बाळासाहेब थोरात पक्षांतर्गत घटनांमुळे दुखावले
विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसने चांगलं यश मिळवलं होतं. परंतु नाशिकमधील डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंत सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ही निवडणूक त्यांनी जिंकली. पक्षांतर्गत घडलेल्या या सर्व घटनांमुळे थोरात दुखावले असल्याचं बोललं जात आहे.