राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. गेल्या १५ महिन्यांमध्ये राज्यातले दोन मोठे पक्ष फूटले. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्ष फूटला. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवून थेट शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपाबरोबर युती करत राज्यात सत्ता स्थापन केली असून एकनाथ शिंदे हेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.
शिवसेनेपाठोपाठ जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. आता अजित पवारांच्या गटानेही मूळ राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला आहे. तसेच अजित पवारांच्या गटानेही भाजपाबरोबर हातमिळवणी केली आहे. अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला असून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.
अजित पवारांच्या गटाने पक्षावर केलेल्या दाव्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या खिशात असल्यामुळे कोणालाही पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू शकतं असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग खिशात घेऊन फिरतेय. त्यामुळे जो गट भाजपाबरोबर जाईल त्यांना चिन्ह मिळेल. २५ आमदार गेले, ३० आमदार गेले, उद्या २ किंवा ३ जण गेले तरी ते पक्षाचं चिन्ह घेऊन जातील. आपला देश हुकमशाही असल्याप्रमाणे चाललाय. देशात मनमानी कारभार सुरू आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय?
विजय वडेट्टीवार म्हणाले, देशात सध्या काहिही होऊ शकतं. जी व्यक्ती भाजपाबरोबर जाईल तिला पक्ष मिळेल. उद्या दोन माणसं भाजपाबरोबर केली आणि त्यांनी पक्ष तसेच पक्षाच्या चिन्हावर दावा केला तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकतं. हे पाहून कोणालाही नवल वाटायला नको.