देशाचे गृहमंत्री अमित शाह सोमवारी (६ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगितलं जातं होतं. त्यामुळे जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु, या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. कथित भेटीच्या बातम्या दाखवल्यामुळे जयंत पाटील यांनी वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. दरम्यान, पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतरही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सगळं बदनाम करण्यासाठी सुरू आहे. यात काही तथ्य नाही. मी स्वतः जयंत पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं मी मुंबईतच होतो. मी त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील) अनेक नेत्यांशी बोललो. त्यांनीही तेच सांगितलं. त्यामुळे मला विश्वास आहे की जयंत पाटील हे अशा टोळीत जाणार नाहीत. ते आमच्याबरोबरच राहतील. महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये ते आमच्याबरोबर दिसतील.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. पाटील म्हणाले, “दररोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरु केला आहे का? तुम्ही बातम्या तयार केल्या आहेत, त्यामुळे आता तुम्हीच त्या बंद करा. मी कुठे गेलो असेन आणि तुमच्याकडे त्याचे पुरावे असतील किंवा माहिती मिळाली, तर बातम्या करा. एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. हे काही बरोबर नाही. परंतु, सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे.”
हे ही वाचा >> “अमित शाहांनी अजित पवारांना ७०,००० कोटींचं व्याज…”, विजय वडेट्टीवारांचा टोला
जयंत पाटील आणि अमित शाहांची भेट झालेली नाही : अजित पवार
अजित पवारांनाही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबद्दल विचारल्यावर अजित पवार म्हणाले, जयंत पाटील आणि अमित शाहांची भेट झालेली नाही. जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर होते. त्यामुळे ते अमित शाह यांना भेटलेले नसताना विनाकारण अशा बातम्या चालवल्या जात आहेत.