मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट आपली घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१३ सप्टेंबर) संध्याकाळी ५ वाजता मनोज जरांगे यांना भेटायला जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावी जाणार आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांची मनधरणी करायला गेलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर ओबीसी समाजाचे अनेक तरूण आमरण उपोषणाला बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जावं. त्यांचं उपोषण सोडवावं. असंही सरकारला काही काम उरलेलं नाही. त्यांना ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आणि उपोषण सोडवणं एवढचं काम उरलंय.
हे ही वाचा >> मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जालन्याला येऊन भेट घेणार, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
विजय वडेट्टीवार म्हणाले, काल गुरुजींनी त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे, त्यांच्या शिष्यांना प्रमाणपत्र दिलं गेलंय. ते (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) तुमची फसवणूक करणार नाहीत असं गुरूजी मनोज जरांगे यांना म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवा असंही म्हणाले. आधी शिष्यांनी गुरुजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा म्हणून गुरुजी त्यांची वकिली करायला गेले होते. त्यापलिकडे जाऊन गुरुजी हे अजित पवारांच्या काळजात घुसून आले. हे काळजीचे लोक आहेत असं प्रमाणपत्रही दिलं आहे. हा भिडे गुरूजी सरकारसाठी सांगकाम्याचं काम करतो का याचं लोकांना काल उत्तर मिळालं आहे.