Vijay Wadettiwar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शिंदे गटातील आमदारांना मस्ती आल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक पोलीस कारची सफाई करताना दिसतो आहे. पोलिसांना तुम्ही घरगड्यासारखं वागवत आहात, हा सत्तेचा माज आहे या आशयाची पोस्ट विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी केली आहे.
काय म्हटलं आहे विजय वडेट्टीवार यांनी?
“शिंदे गटातील आमदारांना सत्तेची आलेली मस्ती बघा… खाकीतील पोलिसांना घर गडी म्हणून वागवताय. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात खाकीतील पोलिसांबद्दल विशेष आदर असतो, त्यांचा धाक असतो. पण महायुती सरकारच्या काळात भाजप-शिंदे गटाचे आमदार खासदार खाकीचा रोज कसा अपमान करतात हे महाराष्ट्र बघतोय. राणे आणि संजय गायकवाड… महाराष्ट्र पोलीस मुकाटपणे का हे सगळं सहन करून घेत आहे? महायुतीतील आमदार खासदारांना खुश ठेवण्यासाठी गृहमंत्री-मुख्यमंत्र्यांचा दबाव पोलीस खात्यावर आहे का ?” अशी पोस्ट विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी केली आहे.
व्हिडीओत काय दिसतं आहे?
विजय वडेट्टीवार यांनी रेड सर्कल करुन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एका बंगल्याबाहेर उभी असलेली कार पोलीस धुतो आहे, स्वच्छ करतो आहे असं दिसतं आहे. महाराष्ट्र पोलिसांना सरकार घरगड्याप्रमाणे वागवत आहे असा आरोप विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी केला आहे.
नेमकं हे प्रकरण काय?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी,त्यांचे वाहन स्वच्छ करीत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. माजी आमदार, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून तो व्हिडीओ पोस्ट केला. एवढंच नव्हे तर त्यावर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे. ज्यानंतर ही हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनीही हाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे एक पोस्ट लिहून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली.
बुलढाणा येथील व्हिडीओ
बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यासह शिंदेच्या ४० आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान आ।दार गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस त्यांचे वाहन धुत असल्याचा एक व्हिडिओ अज्ञात प्रेमीने शूट केला. पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही, मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे.