Vijay Wadettiwar on Guardian Ministers Appointment Postponement : महिनाभर रखडलेल्या पालकमंत्र्यांची यादी १८ जानेवारी रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक मंत्र्यांना संधी देण्यात आलेली नाही. तसेच, काही मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिंदे गटाचे नेते दादा भुसे, रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (१९ जानेवारी) जळगाव येथे व्यक्त केली होती. तसेच या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या गोंधळात आता नवा ट्विस्ट आला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना रायगडचं तर गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं यासाठी भरत गोगावले तर, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आग्रही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मंत्र्यांची नाराजी आणि पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला दिलेल्या स्थगितीच्या वृत्तानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था आहे. ५० दिवसांनंतर जिल्ह्याला या सरकारने पालकमंत्री दिले. त्यात ही आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे! आधी मंत्रीमंडळ विस्तार, नंतर खाते वाटप, आता पालकमंत्री जबाबदारी देण्यासाठी विलंब झाला आणि दिलेले पालकमंत्री बदलण्याची वेळ आली, हे फक्त एका कारणासाठी…. मोठा मलिदा कोणाला मिळणार? जिल्ह्याचा व जनतेचा विकास राहिला दूर, आधी स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत संघर्ष

मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना व भाजपा आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद आलं आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळालं यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली होती. तसेच गोगावले समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar slams mahayuti govt over nashik raigad guardian ministers appointment postpone asc