महाराष्ट्रात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यासोबतच राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या देखील ५०० च्या वर गेली असताना परिस्थिती गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर ५० व्यक्तींच्या परवानगीचं बंधन घालण्यात आलं आहे. मात्र, अजूनही रुग्णसंख्या वाढत असताना आता राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात स्थिती स्फोटक

विजय वडेट्टीवार यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करताना राज्यातल्या करोना स्थितीवर भाष्य केलं आहे. “पुण्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहाता एकूण महाराष्ट्रातली सध्याची स्थिती स्फोटक आहे. अशा स्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून आपण काही निर्बंध लावलेच पाहिजेत, या मताचे मुख्यमंत्री आहेत. आणि ते निर्बंध लावले गेले”, असं वडेट्टीवार म्हणाले.

संपूर्ण लॉकडाऊनचं काय?

दरम्यान, यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी संपूर्ण लॉकडाऊनच्या चर्चांवर देखील खुलासा केला. “राज्यात काही निर्बंध लागू झाले आहेत. आणि राहिला प्रश्न संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा.. तर असा अजिबात कोणताही विचार नाही. निर्बंध मात्र शंभर टक्के कडक करावे लागतील. पण लॉकडाऊन हा विषय समोर नाहीच. जर तशी परिस्थिती उद्भवली, तर तसा पर्याय आपल्यासमोर आहे”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईत लॉकडाऊन लागू होणार?

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात सूचक इशारा दिला आहे. “सर्वांनी जर सर्व नियमांचे पालन केले योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर आपल्याकडे लॉकडाउन होणार नाही. पण जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. मुख्यमंत्री एक-दोन दिवसांमध्ये करोना परिस्थितीवर बोलू शकतात. कारण, रूग्ण संख्या तीन-चार पटीने वाढत आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत.

चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर!

कठोर निर्बंधांचे संकेत!

विजय वडेट्टीवार यांनी बोलताना राज्यात निर्बंध १०० टक्के कडक करावे लागतील, असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. या कठोर निर्बंधांचं नेमकं स्वरूप काय असेल, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा निर्णय ज्या बैठकीत झाला, त्यामध्ये इतर निर्बंधांवर देखील चर्चा झाली. यात शाळा, कॉलेज, चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा बंद करण्याचा विचार झाल्याची माहिती मिळते आहे. त्यासोबतच मुंबईतील लोकल प्रवासावर देखील निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwat speaks on total lockdown in maharashtra strict restrictions impose pmw