उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या नाराजीबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर पालकमंत्रीपदावरून महायुतीत धूसफूस सुरू असून अजित पवार नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, आता या चर्चांवर पडदा पडला आहे. अजित पवार नाराज नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजयकुमार गावित यांनीदेखील अजित पवार नाराज नाहीत, असं सांगितलं आहे.
भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर विजयकुमार गावित यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, अजित पवारांची नाराजी वगैरे काही नाही. दोन दिवसांपासून अजित पवारांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला आले नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी पक्षाची बैठक होती. त्या बैठकीलाही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यांना घशाचा त्रास होतोय. त्यामुळे ते सध्या ते घरीच आराम करत आहेत.
हे ही वाचा >> “बावनकुळेंना सांगतो, अजून १० खासदार पाठवले तरी…”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा
दरम्यान, अजित पवारांच्या नाराजीबाबत सुनील तटकरे यांनीदेखील भाष्य केलं आहे. खासदार सुनील तटकरे म्हणाले, “अजित पवार नाराज असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला आणि केंद्राच्या बैठकीला गैरहजर होते अशा कपोकल्पित कथा आणि अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. खरंतर अजित पवारांची तब्येत ठीक नसल्याने पहिल्यांदाच ते अशा महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिले. करोनाच्या काळातही ते मंत्रालयात आणि पुण्यात बैठका घेणारे एकमेव नेते होते.