देशभरात मोदी लाटेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची दाणादाण उडाली असताना माढा लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावून गड राखला. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाशिव खोत यांनी मोहिते-पाटील यांना अक्षरश: झुंजविले. अतिशय अटीतटीच्या या लढतीत दोघांमध्ये ‘काटे की टक्कर’ झाली. विजय नेमक्या कोणाच्या बाजूने होणार याची अखेपर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरच्या क्षणी मोहिते-पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी २५ हजारांच्या मत फरकाने विजय खेचून आणला.
सायंकाळी उशिरापर्यंत या जागेचा अधिकृत निकाल जाहीर झाला नव्हता. तथापि, अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंह मोहिते-पाटील यांना चार लाख ८९ हजार ९८९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सदाशिव खोत यांना चार लाख ६४ हजार ६४५ इतकी मते मिळाली. मोहिते-पाटील यांच्या विरोधात बंड करून उभे राहिलेले त्यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पारडय़ात केवळ २५ हजार १८७ मते पडली. प्रतापसिंह मोहिते यांच्यासह आम आदमी पार्टी व बसपा व इतर २२ उमेदवारांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या.
या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून विजयसिंह मोहिते-पाटील व सदाशिव खोत यांच्यात विलक्षण झुंज होताना पाहावयास मिळाली. कधी मोहिेते-पाटील यांची आघाडी तर कधी खोत यांनी मुसंडी मारत पुढे जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. २५ व्या फेरीपर्यंत हीच स्थिती होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत या जागेच्या निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. अखेर मोहिते-पाटील यांनी बाजी मारली.
माढय़ात विजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेपर्यंत खोतांनी झुंजविले
देशभरात मोदी लाटेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची दाणादाण उडाली असताना माढा लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावून गड राखला.
First published on: 17-05-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijaysingh mohite patil won against sadabhau khot