देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम असताना अलीकडे काही वर्षांपासून याच राष्ट्रवादीत गटातटाचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक असो व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक, यात राष्ट्रवादीने केलेल्या हाराकिरीमुळे भाजपने आयताच पुरेपूर लाभ उठविला आहे. राष्ट्रवादीतील हे एकमेकांच्या जिवावर उठलेले राजकारण अर्थात पक्षश्रेष्ठींच्याच प्रेरणेतून होते आहे की काय, याबाबत बरीच पुष्टी मिळू लागली आहे. अर्थात यामुळे एकंदरीत सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीच्या प्रमुख अभेद्य गडांपैकी सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख गड मानला जातो. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय जडणघडण याच सोलापूर जिल्ह्य़ात झाली. पवार हे सत्तरच्या दशकात पालकमंत्री म्हणून सोलापुरात कार्यरत असताना त्यांनी आपल्या ताकदीचा पाया याच जिल्ह्य़ात घातला. पुढे तो अधिकाधिक मजबूत होत गेला. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर सत्ता आता-आतापर्यंत राष्ट्रवादीची. बहुतांश तालुका पंचायत समित्या, नगर परिषदा, काही अपवाद वगळता बहुतांश आमदारही राष्ट्रवादीचेच, शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा दूध संघ, बहुसंख्य साखर कारखाने व अन्य सहकारी संस्थांचे जाळेही राष्ट्रवादीच्या धुरिणांनीच विणलेले. असे असतानाही जिल्हा परिषदेची सत्ता भाजपपुरस्कृत महाआघाडीला थेट आंदणच दिली गेली. राष्ट्रवादीने एवढे औदार्य होण्याचे कारण तरी काय, याचा थोडासा जरी कानोसा घेतला म्हणजे जिल्हा परिषदेत भाजपपुरस्कृत अध्यक्ष व्हावा, ही राष्ट्रवादी श्रेष्ठींचीच इच्छा दिसून येते.

आघाडीच्या माध्यमातून स्वत:चे बहुमत असूनही राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या सत्तेवर पाणी सोडण्यामागे खुद्द पक्षश्रेष्ठींचीच सुप्त इच्छा आता उघड झाली असली तरी त्यातून आगामी काळात होणारे राजकीय परिणाम विचारात घेतले म्हणजे यात केवळ खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय ताकद नेस्तनाबूत करणे एवढे एकच लक्ष्य गाठण्याचा हेतू दिसून येतो. पक्षश्रेष्ठींच्या म्हणजे पवार काका-पुतण्याच्या या साऱ्या खेळीतून मोहिते-पाटील यांची चांगलीच कोंडी झाली असून ते चक्रव्यूहात सापडले आहेत. हा चक्रव्यूह भेदत, नजीकच्या काळात मोहिते-पाटील हे कोणता राजकीय निर्णय घेतात, यावर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत, असे दिसते.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

सोलापूर जिल्ह्य़ात वर्षांनुवर्षे मोहिते-पाटील यांचेच राजकीय प्राबल्य राहिलेले आहे. पवार यांनी आखून दिलेल्या अघोषित करारानुसार सोलापूर शहराचे राजकारण काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पाहायचे आणि जिल्हा ग्रामीण भागाचे राजकारण मोहिते-पाटील यांनी बघायचे, हे सूत्र ठरलेले होते. दरम्यानच्या काळात पवार व मोहिते-पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या कुरघोडय़ाही यापूर्वी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. तरीही राजकीय अपरिहार्यता म्हणून मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीतच राहिले आहेत. परंतु पवार काका-पुतण्याने योग्य वेळ साधून मोहिते-पाटील यांचे पंख छाटण्याची संधी सोडली नाही. विशेषत: २००९ सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणांना पहिला धक्का बसला. त्यातून मोहिते-पाटील यांच्या विरोधात पवार यांनी दिलेल्या आधाराने याच जिल्ह्य़ातून पर्यायी नेतृत्वाची फळी उभी करण्यात आली. एकेकाळी मोहिते-पाटील यांनीच मोठे केलेले माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांना आलेले महत्त्व हे त्याचेच द्योतक मानले जाते. याच शिंदे बंधूंपैकी संजय शिंदे हे तर अतिमहत्त्वाकांक्षी नेते मानले जातात. २००९ नंतर जिल्हा परिषदेसह जिल्हा मध्यवर्ती बँक व अन्य महत्त्वाच्या संस्थांची सूत्रे ही संजय शिंदे यांच्याच हातात आलेली. त्यातून मोहिते-पाटील यांचे खच्चीकरण करण्याची एकही संधी संजय शिंदे यांनी सोडली नाही. मागील जिल्हा परिषद सभागृहात मोहिते-पाटील गटाच्या सभापतिपदाच्या उमेदवाराचा उघडपणे घडवून आणलेला पराभव, त्याकडे नंतर पवार काका-पुतण्याने केलेले दुर्लक्ष, माळशिरस परिसरात मोहिते-पाटील विरोधकांना मिळत गेलेले पाठबळ अशी स्थिती असतानाच डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तर केवळ मोहिते-पाटील विरोधक म्हणून पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांना बळ मिळावे म्हणून स्वत:च्या राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार दीपक साळुंके यांचा अक्षरश: बळी देण्यात आला. परिचारक यांना विधान परिषदेवर निवडून पाठविताना ‘किंगमेकर’ म्हणून संजय शिंदे यांचेच नाव झळकले. आता ते स्वत: भाजपपुरस्कृत म्हणून राष्ट्रवादीच्या उघड मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. या माध्यमातून भाजपला आयता लाभ झाला असताना त्याच वेळी संजय शिंदे यांचे बंधू माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे दोघेही नेते भाजपच्या संपर्कात आल्याचे बोलले जाऊ लागले.

अबोला आणखी किती?

या पाश्र्वभूमीवर कमालीचा अस्वस्थ झालेला मोहिते-पाटील गट राजकीय निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे सध्यातरी ‘अबोल’ दिसतात. त्यांचा अबोला किती दिवस राहणार, याबाबत राजकीय जाणकारांची उत्सुकता आहे. मोहिते-पाटील यांचा स्थायीभाव आक्रमक नाही. गर्दीत राहणारे, संयमी व शांत प्रवृत्तीचे मोहिते-पाटील हे कमी बोलणारे नेते म्हणून परिचित आहेत. एखाद्या राजकीय संघर्षांच्या स्थितीत, मान-अपमानाच्या प्रसंगात स्वाभिमानाने ठोस निर्णय घेण्याचे धाडसही त्यांच्याकडे नसल्याचे बोलले जाते. असे गुण त्यांचे दिवंगत बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या ठायी होते. सद्य:स्थितीत दुसरे बंधू जयसिंह व पुतणे धैर्यशील यांनी पक्षश्रेष्ठींच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ‘थांबा व वाट पाहा’ अशीच असल्याचे दिसून येते. नजीकच्या काळात त्यांना ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतच संयम बाळगून राहिले तर त्यांचा पक्षात कितपत मानसन्मान राखला जाईल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. मात्र सद्य:स्थितीत मोहिते-पाटील यांची पार पीछेहाट झाली असून, राष्ट्रवादीचा आधार घेतलेले संजय शिंदे-परिचारक ही मंडळी राजकीयदृष्टय़ा प्रबळ झाली आहेत. त्याचा भाजपला लाभ होत असल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ातील सत्ताकारणातील समीकरणे बदलण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]