भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचा बनाव रचून मंत्रीपदाच्या बदल्यात भाजपा आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी पकडलं आहे. या भामट्याने एकूण सहा आमदारांशी संपर्क केला होता. यामध्ये महाराष्ट्रातल्या चार आमदारांचा समावेश आहे. नागपूर मध्यचे आमदार विकास कुंभारे यांनादेखील या भामट्याने फोन केला होता. हा भामटा कुंभारे यांच्याशी नेमकं काय बोलला. कधी-कधी त्याने फोन केले याचा संपूर्ण घटनाक्रम कुंभारे यांनी नुकताच सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकास कुंभारे म्हणाले, ७ मे रोजी मला सकाळी १० ते १०.३० च्या दरम्यान एक फोन आला. पलिकडची व्यक्ती म्हणाली, मी जे. पी. नड्डांचा पीए बोलतोय. नड्डा साहेब तुम्हाला दुपारी दीड-दोनच्या दरम्यान फोन करतील. मी म्हटलं ठिक आहे. त्यानंतर दोन वाजता मला फोन आला. तो माणूस मला म्हणाला साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर फोनवर दुसरी व्यक्ती बोलू लागली. ती व्यक्ती म्हणाली, कसे आहात विकासजी. मी म्हटलं ठिक आहे. त्यांनी विचारलं तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे. मी म्हटलं, पार्टीची माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. आमदार म्हणून दिलेली सगळी कामं मी करतो.

विकास कुंभारे यांनी सांगितलं, माझं उत्तर ऐकून समोरची व्यक्ती मला म्हणाली, तुमचं काम खूप चांगलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला मोठी जबाबदारी देणार आहोत. माझे पीए तुम्हाला फोन करतील. मी म्हटलं ठिक आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मला परत फोन आला. पीए म्हणून बोलणारी व्यक्ती मला म्हणाली, विकासजी अभिनंदन! तुम्हाला मंत्रीपद दिलं जाणार आहे. परंतु माझ्यासारख्या गरीब माणसाला विसरू नका. त्यानंतर मी विचार केला, एवढ्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पीए जो अधिकारी स्तरावरचा असतो त्याची असली कसली भाषा.

आमदार कुंभारे म्हणाले, या घटनेची माहिती मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिली. त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे पैशांची मागणी केली आहे का? मी त्यांना सांगितलं अजून तरी नाही. त्याच दिवशी मला पुन्हा त्या माणसाचा फोन आला. तो माणूस मला म्हणाला विकासजी तुम्हाला साहेबांनी सांगितलं आहे की, कर्नाटक निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला काहीतरी व्यवस्था करावी लागेल. मी म्हटलं ठिक आहे. त्यानंतर या फोनची मी पोलीस आयुक्तांना माहिती दिली.

हे ही वाचा >> भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी, नड्डा यांचा सहायक असल्याचे सांगणाऱ्याला बेडय़ा

आमदार विकास कुंभारे म्हणाले, कर्नाटकच्या निकालानंतर त्या माणसाचा परत फोन आला. तो मला म्हणाला, विकासजी कर्नाटकचं जाऊ द्या. बडोद्यात आमचा एक कार्यक्रम आहे. त्याचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर जे.पी. नड्डांच्या नावाने दुसरा माणूस म्हणाला, आमच्या पीएंनी बडोद्यात कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. मी म्हटलं ठिक आहे. त्यानंतर पीए मला म्हणाला, १.६६ लाख रुपये बिल झालंय. त्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. या सगळ्याची माहिती मी पोलीस आयुक्तांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आणि फोन नंबर्सच्या आधारे पोलिसांनी त्या भामट्याला पकडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas kumbhare bjp mla gets fake call from jp nadda asking extortion money for ministry asc