केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी सहकारी साखर कारखानदारी बरोबरच शेतीच्या पाण्याचेही काही ‘जाणकार’ नेत्यांनीच वाटोळे केल्याची टीका सोमवारी केली.
दीपावली पाडव्यानिमित्त लोणी बुद्रुक येथे आयोजित ग्रामसभेत विखे बोलत होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि.प.च्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे आदी या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीमुळे ग्रामीण अर्थकारण बदलले. ऊस शेतीबरोबरच इतर पिकांचे उत्पादन वाढले, नोकरी-रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले सहकारी साखर कारखाने खासगी लोकांना विकले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंबीर भूमिका घेऊन सहकारी साखर कारखाने इतर कारखान्यांनाच देण्याचा निर्णय घेतला. शिवाय खासगी लोकांना विकलेल्या कारखान्यांची चौकशी सुरू केली. काही लोकांच्या पुढारपणाला सहकारी साखर कारखान्यांची अडचण वाटू लागली असल्याची टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. राज्यातील शेतीचे पाणी कमी करुन उद्योगांना देण्याचे काम काही लोकांकडून सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी व्यवसायाकडे वळावे, गावाचे गावपण टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहावे असे आवाहन त्यांनी केले.
 राधाकृष्ण विखे म्हणाले, भंडारदरा धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेती, पिण्यासाठी पाणी मिळेल. शेतक-यांनी अधिकाधिक उसाची लागवड करताना ठिबक सिंचनाकडे वळणे गरजेचे आहे. म्हस्के यांनी भंडारदरा धरणातून शेती व पिण्यासाठी एकत्रित आवर्तन द्यावे, दुष्काळाची वीजबिल सवलत शेतक-यांच्या नावे जमा करावी अशी मागण्या केल्या.
उपसरपंच अनिल विखे यांनी विकासकामांची माहिती दिली. सरपंच राजश्री विखे, राहाता पं.स.चे उपसभापती सुभाष विखे, माजी सरपंच काशिनाथ विखे, किसनराव विखे, नंदू राठी, शंकरराव विखे, संपतराव विखे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader