लोकसत्ता वार्ताहर
राहाता : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज, बुधवारी जाहीर करण्यात आला. ९ मे रोजी मतदान व १० मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर आहेत.
नामनिर्देशन पत्रे येथील तहसील कार्यालयात ३ एप्रिल ते ९ एप्रिल या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ मिळतील व स्वीकारली जातील. उमेदवारी अर्जाची छाननी ११ एप्रिलला, छाननीनंतर वैध उमेदवारी अर्जाची यादी १५ एप्रिलला प्रसिद्ध होईल. उमेदवार १५ ते २९ एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप २ मे रोजी होईल. तहसीलदार अमोल मोरे यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारीला तर अंतिम यादी १९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे, कारखान्याचे १० हजार ७७० सभासद आहेत. मागील निवडणूक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. मंत्री विखे व त्यांचे राजकीय हाडवैरी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याही संगमनेर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. मंत्री विखे यांनी संगमनेर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही.
गणेश साखर कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यात होती. भाजपचे विवेक कोल्हे व काँग्रेस नेते थोरात यांच्या युतीने विखे यांच्या ताब्यातून सत्ता हिसकावली. विखे कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात थोरात यांनीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. जिल्ह्यातील विखे व थोरात या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांच्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीत टोकाला गेला होता. साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही त्याच्या पुनःप्रत्ययाची शक्यता आहे. विखेंचा ‘प्रवरा’ व थोरातांचा ‘संगमनेर’ अशा दोन्ही कारखान्यांची निवडणूक एकाचवेळी होत आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्येही विखे कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.
संघर्ष की सहमती एक्सप्रेस?
गणेश कारखाना निवडणुकीत थोरात- कोल्हेंनी एकत्र येत विखेंच्या मंडळाचा दारूण पराभव केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरात लक्ष घालून थोरातांचा पराभव करत ‘गणेश’सह लोकसभेचा बदला घेतल्याचे बोलले गेले. आता संगमनेरात महायुतीचे अमोल खताळ हे आमदार आहेत. कारखाना निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील का, याकडे लक्ष असेल. दुसरीकडे पराभव थोरातांच्याही जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रवरेच्या कार्यक्षेत्रातील विखेविरोधकांना थोरात ताकद देतील का, की आपापले कारखाने बिनविरोध करण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या विखे-थोरातांची सहमती एक्स्प्रेस धावणार, याकडेही लक्ष असणार आहे.