प्रवरा व मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याविरोधात या पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधिमंडळातील काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांनी ही माहिती दिली. गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश दिला आहे. जायकवाडी धरण लाभक्षेत्रात पाण्याची गरज असल्याचे सांगून भंडारदरा व मुळा धरणातून साडेसात टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शेतक-यांवर अन्याय करणा-या या निर्णयाविरोधात डॉ. विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सभासदांच्या वतीने स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
डॉ. खर्डे यांनी सांगितले, की सद्य:स्थितीत जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची गरज भागेल एवढा पाणीसाठादेखील शिल्लक राहू शकतो. सध्या या लाभक्षेत्रातून पाण्याची कोणतीही मागणी नाही. तरीही जलसंपदा विभागाने नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा केलेला निर्णय अन्यायकारक आहे.
जायकवाडीला पाणी देण्यावरून विखे साखर कारखान्याची सुप्रीम कोर्टात धाव
प्रवरा व मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.
First published on: 09-12-2014 at 06:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikhe sugar factory submits petition in supreme court on jayakwadi water issue