केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांना प्रतीक्षा करणे भाग पडले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात विलास मुत्तेमवार व मुरली देवरा यांना राज्यातून संधी मिळणार असल्याची काँग्रेस वर्तुळात चर्चा होती.  गेल्या दोन महिन्यांपासून मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींनी मोठे बदल करण्याचे निश्चित केले आहे. मंत्रिमंडळाचा चेहरा बदलण्याबरोबर संघटना बळकट करण्याचे उद्दीष्ट यामागे आहे. विलास मुत्तेमवार पक्ष संघटनेत सक्रिय असून त्यांना मंत्रिमंडळात संधी देत विदर्भात काँग्रेसची स्थिती आणखी बळकट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मुत्तेमवारांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे.  यापूर्वी मुत्तेमवारांकडे केंद्रीय अपारंपरिक ऊर्जास्रोत राज्यमंत्री खात्याचा स्वतंत्र प्रभार होता. मात्र हे खाते फारसे महत्त्वाचे नसल्याने मुत्तेमवारांना स्वत:चा प्रभाव पाडणे कठीण गेले. त्यानंतर मुत्तमेवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. विलास मुत्तेमवारांची लोकसभेवर निवडून जाण्याची ही सातवी वेळ असून राजधानीत त्यांनी स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे.  राजीव गांधी यांच्या काळापासून गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या मुत्तेमवारांना अनेक राजकीय चढ-उतारांना तोंड द्यावे लागले आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी दखल घेण्याजोगी कामगिरी केल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची त्यांना अपेक्षा आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची राहील. गडकरींच्या उमेदवारीचा फायदा विदर्भातील इतर जागी मिळवण्याची योजना भाजपने तयार केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुत्तेमवार योग्य आहेत, अशी भावना काँग्रेसच्या वर्तुळात आहे.  गडकरींना टक्कर देण्यासाठी तोडीस तोड उमेदवार म्हणून मुत्तेमवार वगळता अन्य कोणताही नेता काँग्रेसजवळ सध्या तरी नाही. केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना नागपुरातून लढविले जाणार असल्याची चर्चा असली तरी त्याला फारसा आधार नाही. सध्या केंद्रात विदर्भातून मुकुल वासनिक हे काँग्रेसचे एकमेव मंत्री आहेत. वासनिक यांचे आजवरचे राजकारण दरबारी पद्धतीचे राहिले आहे. विलास मुत्तेमवार हे तळागाळातील कार्यकर्ते आणि बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांना लाल दिवा दिला तर संपूर्ण विदर्भात पक्षाला त्याचा फायदा मिळेल, अशी भूमिका काँग्रेसच्या वर्तुळात मांडली जात आहे.  राम मंदिर आंदोलनाच्या काळात बनवारीलाल पुरोहित यांचा अपवाद वगळता संघ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरातून भाजपला लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. या वेळी नागपूर जिल्ह्य़ात भाजपच्या आमदारांची संख्या सात आहे. नागपूर शहरात देवेंद्र फडणवीस, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख आणि कृष्णा खोपडे असे चार आमदार तर जिल्ह्य़ात चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), विजय घोडमारे (हिंगणा) आणि सुधीर पारवे (उमरेड) आहेत. या तुलनेत गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड मिळालेली आहे. त्यामुळे नागपूर शहरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे.  काँग्रेसमध्ये सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, रणजीत देशमुख, नितीन राऊत, मुत्तेमवार अशी असलेली विभागणी भाजपच्या पथ्यावर पडली होती. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी आता सर्वानाच इशारा देत एकदिलाने काम करण्याची सूचना केली आहे. या सर्वाना एकत्र घेऊन चालण्याचे काम करताना विलास मुत्तेमवार यांना आपले सारे कसब पणाला लावावे लागणार आहे. केंद्रीय मंत्रिपदाचे वेध लागलेले मुत्तेमवार सध्या तरी कोणत्याही गटात नाहीत. मुत्तेमवारांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसली तरी केंद्रीय मंत्रिपदाची त्यांना अपेक्षा आहे. प्रत्यक्षात राजधानीत शपथविधी होईस्तोवर काहीच खरे नसते याची पुरेपूर जाणीव असलेल्या मुत्तेमवारांना याबाबत आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा