दिगंबर शिंदे
सांगली : सहा विधानसभा मतदारसंघ, आठ तालुके आणि सुमारे दोन हजार मतदान केंद्रे आहेत. मग या मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर तरी तुमच्या पक्षाकडे कार्यकर्ते आहेत का, असा प्रश्न भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना विचारला. पाठिंब्यासाठी आलेल्या राऊत यांना विचारलेल्या सवालाची ही चर्चा आज दिवसभर जिल्ह्यात रंगलेली होती.
शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राऊत यांनी जगताप यांची जतमध्ये भेट घेतली. भाजपबद्दल आणि भाजप उमेदवाराबाबत नाराजी असल्याने शिवसेनेचे पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी आग्रही मागणी खा. राऊत यांनी केली. यावेळी जगताप यांनी सांगितले, की तुमच्या पक्षाची या जिल्ह्यात ताकद नाही. ज्या पक्षाची ताकद आहे, त्याला उमेदवारी मिळणे गरजेचे असताना शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. प्रचार करणे तर दूर पण मतदारसंघातील या दोन हजार मतदान केंद्रांवर, बूथवर पक्षाचे काम करण्यासाठी देखील कार्यकर्ते उपलब्ध नाहीत. मग एवढय़ा मोठय़ा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचे भवितव्य काय असणार? काँग्रेसचे विशाल पाटील उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून त्यांचा काय निर्णय होतो यावर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र अशा पद्धतीने तिरंगी लढत झाल्यामुळे भाजपचा फायदा नक्कीच होणार असल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली.