लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस विकासदिन म्हणून जिल्हाभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मांजरा, विकास, रेणा, जागृती या साखर कारखान्यांच्या वतीने अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.
विकास साखर कारखान्याच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यावर भर दिला जाणार असून, लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ लातूर तालुक्यातील शिराळा येथे करण्यात आला. सहा किलोमीटरच्या नाला सरळीकरण, रुंदीकरण व खोलीकरणाचा शुभारंभ झाला.
लोकसहभाग वाढला तर सिंचनाची शंभर टक्के व्यवस्था करणे शक्य आहे. नदीवर ज्याप्रमाणे बांध घालण्यात आले, त्याचबरोबर गावोगावी शेतीचे व पिण्याचे पाणी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जागृती साखर कारखान्याच्या वतीने १ हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
मांजरा साखर कारखान्याच्या वतीने कृषियंत्र प्रदर्शन व रक्तदान शिबिर घेण्यात आले. कृषियंत्र प्रदर्शनात ऊसतोडणी यंत्र, ऊस पाचट बेिलग यंत्र, ऊसलागवड यंत्र, लहान ट्रॅक्टर असे विविध यंत्र उपलब्ध होते. यंत्राची पाहणी करण्यास शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ७० जणांनी आपला सहभाग नोंदवला. आमदार दिलीपराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
रेणा साखर कारखान्यावर सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ५४५ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात ७१ जणांनी आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी कारखान्याच्या सभासद व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

Story img Loader