भारताचा विकास करायचा असेल, जगाच्या प्रगत राष्ट्राच्या प्रगत पंक्तीत जाऊन बसायचे असेल, राष्ट्राला विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे असेल तर खेडय़ांचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील ७० टक्के जनता खेडय़ात राहते, त्या खेडय़ाचा विकास ज्या दिवशी होईल, त्या दिवशी राष्ट्राचा विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चौल येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रामउदय ते राष्ट्रउदय स्वप्नपूर्ती कार्यक्रमांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचा समारोप चौल येथे करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी पोळ, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. कृपाली बांगर, आरोग्य अधिकारी शैलेश घालवडकर, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाल, तसेच चौल ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर प्रमुख अतिथी अनंत गीते यांचा, तसेच उपस्थित मान्यवर यांचा सत्कार शाल, श्रीफळ तसेच श्री रामेश्वर मंदिर प्रतिमा चित्र भेट देऊन चौल ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतीक्षा राऊत यांनी केले. या वेळी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अनिल चोगले, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण राऊत, अ‍ॅड. विलास नाईक, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पंचायत समिती सदस्या नीलिमा भगत, माजी सरपंच रुपाली म्हात्रे, शिवसेना मुरुड तालुकाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुका शिवसेनाप्रमुख हेमंत पाटील, आक्षी ग्रा.प. सरपंच शंकर गुरव आदी शिवसेना पदाधिकारी तसेच चौल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात आदी हजर होते.

या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, भारताची निर्मिती झाल्यापासून प्रथमच अर्थसंकल्पात ८० लाख करोड रुपयांची तरतूद ग्रामविकासाकरिता करण्यात आली आहे. यामुळे पुढील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होणार असल्या तरी स्पर्धा निकोप असावी, तरच खेडय़ाचा विकास तुम्हाला, मला व आम्हाला करता येईल. राजकारणविरहित विकासासाठीच चौल ग्रामपंचायतीची निवड या कार्यक्रमासाठी केली असल्याचा खुलासा त्यांनी या वेळी करताना चौल गावाला ऐतिहासिक वारसा लाभल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपकार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी व पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. कृपाली बांगर आदींनी उपस्थितांना संबोधित केले. विनायक भोनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने चौल ग्रामपंचायतीच्या सभागृहात रक्तदान शिबीर, डोळे तपासणी, जनरल तपासणी आदी सामाविष्ट आरोग्य शिबिरांचे तसेच महिलांच्या बचत गटाच्या वतीने विविध गृह पदार्थाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Story img Loader