विकासकामांच्या धडाक्यामुळे नक्षलवाद्यांचा कणा मोडला असल्याचा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी केला असतानाच शनिवारी नक्षलवाद्यांनी त्यांचा बालेकिल्ला अभेद्य असल्याची प्रचिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यदौऱ्याचे निमित्त साधत नक्षलवाद्यांनी तब्बल तीन गावांतील १२०० ग्रामस्थांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवले. रात्री उशिरा त्यांची सुटका केली. मात्र, त्यातील एकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली.
नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराने कायम चर्चेत राहणाऱ्या बस्तरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी दंतेवाडा येथे घेतलेल्या सभेत काही विकासकामांची घोषणा केली. या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त असताना नक्षलवाद्यांनी दंतेवाडापासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकमा जिल्ह्य़ात हे ओलीस नाटय़ घडवून आणले. या जिल्ह्य़ातील तोगपाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारेंगा, टिकनपारा व तहतवाडा या तीन गावांत नक्षलवादी गेले. सुमारे ५००च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना एकत्र गोळा केले. नंतर ग्रामस्थांना जबरदस्तीने जंगलात नेण्यात आले. दोन पाडय़ांमध्ये विभागल्या गेलेल्या मारेंगा गावात मध्ये मोठा नाला आहे. त्यावर पूल हवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यास नक्षलवाद्यांचा विरोध आहे. अखेर ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी आम्ही संरक्षण देतो, तुम्ही पुलाचे बांधकाम करा, असा प्रस्ताव सरकारला दिला होता. एक महिन्यापूर्वी पोलिसांनी कवासी हिडमा या जहाल नक्षलवाद्याला अटक केली होती. त्याची माहिती या ग्रामस्थांनी पोलिसांना दिली असा नक्षलवाद्यांचा आरोप होता. हे ग्रामस्थ शनिवारी मोदींच्या सभेसाठी दंतेवाडय़ाला जाणार होते. या पाश्र्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याचे निमित्त साधत नक्षलवाद्यांनी हे अपहरण नाटय़ घडवून आणले. याची माहिती सकाळी सर्वाना मिळाली. मात्र, पंतप्रधानांचा दौरा आटोपेपर्यंत प्रशासनाकडून अशी घटना घडलीच नाही, असे सांगण्यात येत होते. मोदी कोलकाताला रवाना होताच मुख्यमंत्री रमणसिंह यांनी अडीचशे ग्रामस्थांना नक्षलवाद्यांनी ताब्यात ठेवले आहे, असे जाहीर केले.
नक्षलवाद्यांच्या म्होरक्याला पुण्यात अटक
पुणे दहशतवादविरोक्षी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे तळेगाव परिसरातून नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा म्होरक्या के. मुरलीधरन उर्फ अजित याला अटक केली. मुरलीधरनचा साथीदार इस्माइल हमजा उर्फ प्रवीण यालाही पथकाने अटक केली.
मुरलीधरन हा नक्षलवाद्यांचा प्रमुख नेता गणपती याचा जवळचा सहकारी आहे. दक्षिणेतील अनेक राज्यातील पोलीस त्याच्या मागावर होते. मुरलीधरन याला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्याची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.
पुलाच्या पर्यवेक्षकाची हत्या
मारेंगा गावातील पुलाच्या बांधकामावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या सदाराम याची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचे समजते. रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी सर्व ओलिसांची सुटका केल्याचा दावा छत्तीसगड पोलिसांनी केला. नक्षलवाद्यांनी मात्र ओलीसनाटय़ाचा इन्कार करत संबंधित ग्रामस्थांची लोक अदालत जंगलात आयोजित केली होती, असा दावा केला आहे.