करोनाचं संकट ओसरलं असतानाही शिर्डीमधील साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी असल्याने स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. राज्यातील इतर मंदिरांनी नियम शिथील केलेले असतानाही साई मंदिरात मात्र बंदी असल्याने संताप व्यक्त होत असून, शुक्रवारी त्याचे पडसाद उमटले. साई संस्थानच्या भूमिकेला स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी आव्हान दिलं असून, मंदिरात हार, फुलं नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांसोबत त्यांची झटापट झाल्याने वातावरण चिघळलं.

करोना काळात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता करोनाचं संकट ओसरत असताना इतर मंदिरांनी ही बंदी मागे घेतलेली असताना, साई संस्थानने मात्र बंदी कायम ठेवली आहे. याविरोधात आता स्थानिक फूल विक्रेते आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलन करण्यात आलं. दर्शनाच्या रांगेत उभं राहून त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यांनी मंदिरात फुलं, हार नेण्याचा प्रयत्न केला असता, सुरक्षारक्षकांनी रोखलं.

Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

अहमनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी यावर एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “हा बऱ्याच दिवसांचा प्रश्न असून, सर्वांच्या भावना, भूमिका जाणून घेण्याची गरज आहे. सर्वांच्या भावनांचा मान राखत सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे. पण याप्रकरणी साई संस्थान विश्वस्त मंडळाने लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जेव्हा अशाप्रकारे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेतला जातो, तेव्हा असे परिणाम दिसतात”.

“महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली असली किंवा तेथील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी राजकारण न करता त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली पाहिजे. पण त्यांना विश्वासात न घेता निर्णय रेटून घेणं हे संयुक्तिक नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

मतदारसंघातील कोणत्याही शेतकऱ्याला, ग्रामस्थांना मारहाण, इजा झाली तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.