केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणारी जलजीवन पाणी योजना कर्जत तालुक्यातील बेनवडी गावामध्ये योग्य पद्धतीने राबवली गेली नाही. पाणी असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने या योजनेच्या झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी कर्जत राशीन रस्त्यावर बेनवडी फाटा येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सचिन खुडे, खंडू गदादे, सुधीर बुवा, पोपट देशमुख, गिरीश घोडके, महादेव गदादे, विश्वास डमरे, उत्कर्ष गायकवाड, तुषार कांबळे, गणी सय्यद, रेवन खुडे, मच्छिंद्र गदादे, तुकाराम गदादे, संदीप क्षीरसागर, सुभाष अडवल, अजित खुडे, नवनाथ कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सचिन खुडे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील बेनवडी गावामध्ये सन २०२१- २२ मध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना मंजूर झाली. या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाचे बिल देखील काढण्यात आले आहे . आज या योजनेच्या विहिरीमध्ये भरपूर पाणी असताना देखील गावातील व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी व जनावरांच्या साठी पाणी मिळत नसल्यामुळे परिसरामध्ये वणवण फिरून पाणी आणावे लागत आहे. तर काही नागरिक पाणी विकत घेत आहेत.
वास्तविक पाहता ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे. मात्र या गावांमध्ये केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आज पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या योजनेच्या संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. व जो पर्यंत नागरिकांना गावकऱ्यांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा श्री खुडे यांनी यावेळी दिला. यावेळी खंडू गदादे सुधीर बुवा विश्वास डमरे मच्छिंद्र गदादे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यानंतर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली व लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.