* शनिशिंगणापूरमध्ये महिलेने दर्शन घेतल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा बंद
* विश्वस्त बानकर यांचा राजीनामा *  सात कर्मचारी निलंबित
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन एका महिलेने दर्शन घेतल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आज, रविवारी परंपराप्रिय गावकऱ्यांनी बंद पाळून निषेध सभा घेतली. मूर्तीला दूध व तेलाचा अभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आले. या वेळी महाआरती केल्यानंतर बंद केलेले दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले. संस्थानचे सात कर्मचारी निलंबित करण्यात आले असून, विश्वस्त सयाराम बानकर यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. घटनेनंतर शनिदेवाला राजकारण्यांच्या साडेसातीचा फेरा बसला असून, विश्वस्त मंडळाच्या आगामी नेमणुकीमुळे त्याला वेगळे वळण मिळाले आहे.
आज गावकऱ्यांनी निषेध सभा घेतली. सरपंच बाळासाहेब बानकर, विश्वस्त सयाराम बानकर, बाळासाहेब बोरुडे, बापूसाहेब शेटे, डॉ. रावसाहेब बानकर, दादा घायाळ उपस्थित होते. त्यांनी निषेध करून गाव बंद ठेवले. विश्वस्त मंडळाने सामुदायिक राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मूर्तीला दूध व तेलाचा अभिषेक करून महाआरती केली. मूर्तीच्या शुद्धीकरणानंतर दर्शन खुले झाले. शेकडो वर्षांची परंपरा मोडण्यास विश्वस्त जबाबदार असल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एकमेव विश्वस्त बानकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली. संस्थानने सात सुरक्षारक्षकांना निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. पोलीस ठाण्यात मात्र याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
शनैश्वर देवस्थानची वार्षिक मिळकत ३२ कोटी असून, संस्थानवर राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंतराव गडाख व त्यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गडाख यांचे वर्चस्व आहे. गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गडाख यांच्या मंडळाचा पराभव होऊन भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची सत्ता आली. गडाख हे संस्थानचा राजकारणासाठी वापर करीत असून, अनेक कर्मचारी नोकरीला राजकीय सोयीसाठी लावले म्हणून तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच संस्थानच्या कारभारात आर्थिक गोंधळाची चौकशी तक्रारीवरून धर्मादाय आयुक्तांनी सुरू करण्यात आलेली आहे. संस्थानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी दरंदले यांच्यासह काही विश्वस्त गडाख यांच्या संस्थेत सेवेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गडाख व मुरकुटे समर्थकांमध्ये संस्थानच्या अनेक विषयांवरून वाद असून त्याच्या तक्रारी सुरू आहेत. कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ हे या कटकटीला कंटाळून सहा महिन्यांपासून रजेवर होते. ते काल हजर झाले. त्यानंतर ही घटना त्याच दिवशी घडली. घटना घडल्यानंतर विश्वस्त मंडळ गावकरी व भाविकांना सामोरे गेले नाही. त्यांनी माध्यमांशीही संपर्क तोडला. त्यामुळे या घटनेचे राजकारण अधिक पेटले.
संस्थानच्या विश्वस्त मंडळाची चालू महिन्यात मुदत संपत आहे. आता नव्या वर्षांत नवीन विश्वस्त मंडळ नेमले जाणार आहे. गावातीलच विश्वस्त नेमण्याची तरतूद संस्थानच्या घटनेत आहे. त्यामुळे आता विद्यमान विश्वस्तांची नेमणूक होणार नाही, तसेच त्यांच्या कारभाराच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावण्यात आले आहे. विश्वस्तांना लक्ष केले जात असले तरी नेम मात्र गडाख यांच्यावर आहे. आता या घटनेत मुरकुटे समर्थक, पदाधिकारी हे आंदोलनात पुढे होते. एकूणच शनिदेवाला राजकारण्यांचा फेरा पडला आहे.

शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना दर्शनबंदी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांनी पूर्वी या परंपरेविरोधात आंदोलन केले होते. त्याला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार अनिल राठोड, मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी विरोध केला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुरुषांनाही चौथऱ्यावर जाण्यास बंदी करण्यात आली. चौथऱ्यावर केवळ पुजारी व अभिषेक ज्यांच्या हस्ते केला जातो त्यांनाच जाऊ दिले जाते.

Story img Loader