महाड एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतील सांडपाणी सावित्री नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्याचा परिणाम नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषण मंडळ या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत तालुक्यातील ग्रामस्थांनी मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलानाला सुरुवात केली. अखेर प्रदूषण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित आले.
महाड औद्योगिक वसाहतीमधील सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून नदी आणि नाल्यामध्ये प्रक्रिया न करता पाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्याचा परिणाम सभोवतालच्या गावांवर होत असल्याचा आरोप बिरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन बागडे यांनी केला. सार्वजनिक प्रक्रिया केंद्राची चौकशी आणि कारवाई करण्याच्या मागणीसाठी बागडे गेले दोन दिवस प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
वरील विषयावर आज मंडळाच्या कार्यालयाबाहेर असलेल्या प्रांगणामध्ये बैठक घेण्यात आली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुपाते, महाडचे आमदार भरत गोगावले, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, टोळचे ग्रामस्थ नासीर जलाल, अनिस जलाल, इक्बाल माटवणकर, डॉ. सुधीर पटवर्धन, माधव बागडे, युवा नेते हनुमंत जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष निकम, उपप्रादेशिक अधिकारी साळुंके यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते.
येथील रासायनिक कारखानदार प्रदूषित पाणी थेट नदीनाल्यांत सोडत असल्याने सावित्री प्रदूषित झाली आहे. सर्व कारखान्यांच्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे, परंतु या केंद्रातूनच दूषित पाणी सोडले जात असल्याने चौकशीची मागणी करण्यात आली. दूषित पाण्यामुळे खाडी विभागातील चोचिंदे, सव गोठे, चिंभावे, कुंबळे, जुई, वराठी, ओवळे या गावांचे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्याची कार्यवाही का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने विहिरींचे पाणीदेखील दूषित झाले आहे. अशा प्रकारच्या अनेक समस्या खाडी विभागांमध्ये निर्माण झालेल्या असताना शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही. दूषित पाणी आंबेतच्या खाडीमध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु एमआयडीसीने पाइपलाइनचे काम ओवळे गावार्प्यत केले असल्याने दूषित पाणी गावाजवळच्या खाडीत सोडले जाते. त्यामुळे गावात सर्वत्र दरुगधी पसरली आहे. सदरची पाइपलाइन आंबेतपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारींची त्वरित दखल घेण्यात येईल, असे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे डॉ. सुपाते यांनी या वेळी दिले. त्याचप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय योजणे आवश्यक आहे त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन बैठकीमध्ये देण्यात आले. ग्रामस्थांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये आमदार गोगावले, प्रांताधिकारी हजारे साळुंके यांनी सहभाग घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा