राज्यभरातील हजारो खेडय़ांमधील रहिवासी आणि वन्यप्राणी थेंब थेंब पाण्यासाठी मैलोंगणती वणवण भटकत असताना नियोजनबद्ध काम केल्यास अशा अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते, याचे उदाहरण मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रक्षा खेडय़ातील गावक ऱ्यांनी नैसर्गिक जलस्रोतानजीक श्रमदानाच्या माध्यमातून बांधलेल्या पाणवठय़ाद्वारे दाखवून दिले आहे. मेळघाटात यावर्षी पाण्याची अभूतपूर्व टंचाई असून गावेच्या गावे आणि वनप्रदेशातील पाणवठे जवळजवळ कोरडे पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात मेळघाटच्या जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडून शिकाऱ्यांच्या तावडीत आयतेच सापडतात किंवा विहिरी वा कालव्यात पडून मृत्युमुखी पडतात.
शेतातील विहिरींमधील पाणी पिण्यासाठी गावात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्षांतही अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. हरीण, नीलगाय, सांबर गावात शिरल्यास गावठी कुत्री पाठलाग करून त्यांचे लचके तोडत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकणारे वन्यजीव अशा दुहेरी आपत्तीमुळे संकटात सापडले असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील रक्षा खेडय़ात राहणाऱ्या गावक ऱ्यांनी निसर्ग संरक्षण संस्थेच्या मदतीने हत्तीकुंडनजीक खास बंधारा बांधून वन्यजीवांसाठी पाणवठय़ाची सोय उपलब्ध करून दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आसोले आणि संवर्धन सहायक राहुल काळमेघ यांनी हत्तीकुंडजवळ वन्यजीवांसाठी बंधारा बांधण्याची कल्पना गावकऱ्यांना सुचविली. हत्तीकुंड हा रक्षा खेडय़ाचा मुख्य नैसर्गिक जलस्रोत असून त्याच्या शेजारीच हा बंधारा बांधण्यात आला आहे. अनेक दिवसापर्यंत बंधारा खोदल्यानंतर २४ तासांत पूर्णपणे पाण्याने भरला आणि गावक ऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. बंधाऱ्यावर आता वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत आहेत.

Story img Loader