छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता.
या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची समिती, विशेष तपास पथक यांच्या तपासाबाबत होत असलेल्या प्रक्रियेविषयीही उभयतांमध्ये चर्चा झाली.
धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या हाती अद्याप ठोस पुरावे नसल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचेही त्यांनी भेटी दरम्यान सांगितल्याचे समजते. तसेच देशमुख यांच्याकडे काही पुरावे असून त्याचीही माहिती ते २८ फेब्रुवारी रोजी पोलीसांना देणार असल्याची माहिती आहे. अन्नत्याग आंदोलनात सकाळपासूनच ग्रामस्थ सहभागी होत असून, यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लावण्याच्या संदर्भाने घोषणाबाजी करण्यात येत आहे.